साहित्य प्रकार

Friday, September 14, 2012

वेदनांचा भारगाडा...


नागमोडी वाट झाली चालता ही येत नाही
चालतो ती वाट आता, सोडता ही येत नाही.

वेदनांचा भारगाडा ओढता ही येत नाही.
भालरेषा ही अभागी, खोडता ही येत नाही.

दावलेसी तू कशाला इंद्रधनुचे रंग सारे?
भंगलेले स्वप्न आता, जोडता ही येत नाही.

गोवलेसी तू कशाला रेशमाचे बंध येथे?
बांधलेला जन्म आता, तोडता ही येत नाही.

काळ गेला डाव आला खेळता ही येत नाही
मांडलेला खेळ आता, मोडता ही येत नाही.

आसवांना पापणीत पेलता ही येत नाही
साचलेला आत टाहो, फोडता ही येत नाही.

No comments:

Post a Comment