साहित्य प्रकार

Thursday, August 9, 2012

सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.

सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.

सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.

दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.

नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर

भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.

मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.

किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर

कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर.

Wednesday, August 8, 2012

जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.

जीवन म्हणजे भातुकलीचा खेळ नाही.
प्रीती म्हणजे चौपाटीची भेळ नाही.

एकच आमुचे आकाश आहे.. एक जमीन.
तरी कसा मग तुझा नि माझा मेळ नाही?

सुख दु:खाचे देणे घेणे राहोच पण,
अंत्ययात्रेस कुणाकडेही वेळ नाही.

आत्मपीडाच दाव म्हणतो कोण शहाणा,
आत्मा म्हणजे सोलायाचे केळ नाही.

ओळख माझी सुधाकरीला चाखून घ्या
देवदार मी रानामधला हेळ नाही.

Tuesday, August 7, 2012

वेगळे ना व्हायचे होते मला

वेगळे ना व्हायचे होते मला
स्वत:सच जोखायचे होते मला

गर्दीत ही गेलो नाही मी कधी
एकांतात जगायचे होते मला.

कुणाशी ना बोललो तरी येथे
नसून मी असायचे होते मला.

दु:ख माझे सांगू मी कसे तुला?
वेदनेत हसायचे होते मला.

आजन्म हा तुजसाठी झिजवूनी
मजसाठी उरायचे होते मला.

चुकूनी मी वाट आलो स्मशानी
माणसातच जायचे होते मला.

राजा होणे राजाचीही नकल होती

खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

बालम की गलीं में.........!

हां... ये रसमें ये कसमें सभी तोड के,
तु चली आ चुनर प्यार की ओढ के |
या चला,....जाऊंगा,...मै ये जग छोड के |
सात्वीक प्रेमानं भरलेल्या, र्‍हुदयाच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक, संवेदनशील मनाला भाव व्याकुळ केल्याशिवाय रहात नाही. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, ज्यानी बॉलिवुड्च्या दुनियेला पुराणी यादें
म्हणुन तिन हजाराहून अधिक गाणी दिली. आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ए॓कणारा प्रत्यकजन पुर्णपणे
नाहूण निघेल तो म्हणजे मुकेश यांचा. ( चित्रपट - कटीपतंग)
जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहेरना नही |
जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां,
उस गलींसे हमें तो गुजरना नहीं |
आजही बहुतेकानां वाटतं, की खरंच ते जुने दिवसच किती सुंदर होते. पण आज ते राहीलं नाही. आणि
माणसा-माणसातील ते सात्वीक प्रेमही उरले नाही. कोणास ठाऊक तसं झालं आहे काय, पण खर्‍या प्रेमाची
त्या वेड लावणार्‍या क्षणांची आणि क्षणा क्षणाला आठवण करून देणार्‍या खर्‍या प्रेमाची एक अस्सल अनुभूती
या शब्दातच नाही का? त्या चोरून भेटण्याच्या जागा, रानफुले, नदी किणारे, झाडा झुडुपांचे आडोसे आणि
रात्रीचा चंद्र कोरून येणारं निखळ चांदणं. आपल्याच नकळत हे किती तरी आपल्या प्रेमाचे साक्षीदार असतात.
व म्हणुनच त्या ठिकाणी आपण परत कधी एकटेच गेलो तर एक क्षणभर देखिल थांबनं किती मुश्कील होऊन जातं.
या गाण्याचं पहीलं कडवं, जे मला अतिशय आवडतं -
जिंदगी में कई रंग रलीयाँ सहीं,
हर तरप मुस्कुराती ये कलीयाँ सहीं,
खु-बसु- रत बहारों की गलीयाँ सहीं |
जिस चमन में तेरे पग में काटें चुबें,
उस चमन सें हमें फुल चुनना नहीं |
जिस गली में...........................!
आSss हा.ss.हांssss फुलांची फुलबाग असो वा सोन्याची सुवर्णनगरी, जिथे माझ्या प्रियेला किंचीतस ही
दु:खं पोहोचेल, अशी वाटच मला चालायची नाही. या पहील्या कडव्यातच आनंद बक्षी यांना दाद दिल्या शिवाय
दुसरा पर्यायच उरत नाही. या अप्रतिम निर्मितीत आणखी एक सिंहाचा वाटा म्हणजे आर.डी. बर्मन यांचा. अतिशय अफलातुन असं संगीत त्यांनी दिले आहे. गाण्याचं प्रत्यक कडवं संपताच एक बासरी(फ्लुट) वाजते. काळजाला स्पर्श करून जाणारी. फार व्याकुळ वाटतं तेंव्हा.......!

शब्दांच्या मी वादळातला एक नारा

अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

नकोस येऊ माणसात पुन्हा मेंढरा
फिरतो इथे अजून आहे अदिम वारा.

अंधाराचा झाकतो हा गुढ पिसारा
परी शब्दांचा उजेड नच लोपणारा.

आई

जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

मना मनात आहे धुके दाटलेले

मना मनात आहे धुके दाटलेले
ओठांत एक गाणे मुके गोठलेले.

कळपामध्ये जे ही मला भेटलेले
न्हवते कुणीच वेडे, वेड घेतलेले.

दिसतात जरी हे.. चेहरे हसलेले
प्रत्यकाच्या उरात युध्द पेटलेले.

आसक्तते पोटी.. प्रेम बाटलेले
चंदा पायी एका सुर्य झाकलेले.

विश्वासाने सांग सत्य भेटलेले
अविश्वासाचे का मेघ दाटलेले?

दिसवयास सारे वरून नटलेले
हिरवे झाड परी आतून वटलेले.

डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.

पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.

कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.

-----------------------------------------------------------------------------
ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्‍याचा जीव वाचवणारा.
पश्च्यात = उद्देशीत व्यक्ती नसताना, मागुर्‍या. चेहर्‍याआड
-----------------------------------------------------------------------------

Monday, August 6, 2012

अता वाकून ये आभाळा

अता वाकून ये आभाळा
जराशी होईन मी निळा

पहातोय वाट तुझी मी
बनुनी अहिल्येची शीळा

झुंजताना मी तनकटाशी
इथे मोडला रे विळा

गेली सारी सुकून राने
भरु दे चांदण्याने मळा

गेला संपून हा प्रवास
आता उघडावे दार तिळा.

हुदयाच्या ही कैक कळा
तुला सांगेन मी आभाळा

पाहू तरी तुझ्यात आता
खरा आहे किती जिव्हाळा.

जगणे म्हणजे कटकट नुसती

जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती

कोणी हसते कोणी रुसते
प्रत्यकाची ही वटवट नुसती.

पैका पैका जोडण्यास ही,
नाती तुटती तटतट नुसती

देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती

भासां मागे रोज धावते
पायांची ही फ़टफ़ट नुसती.

कसा राहू मी अभंग आता

कसा राहू मी अभंग आता
तुझा सोसवेना संग आता.

दवांत नाहून पहाट आली
ग झाक फ़ूलांचे अंग आता.

कधीचा आहे निरंगीच मी
तुझा वेगळा दे रंग आता.

फ़ुलावयाची तू ठेव आशा
पाषाण पावते भंग आता.

मधूर बोल हे निष्प्रेमाचे
शब्दही झाले भणंग आता.

जगाचा नुरला ताल विठ्ठला
इथे बोलेना मृदंग आता.

वास्तवाचाही स्वप्नामध्ये....!

अष्टोप्रहर झिजून येथे, रचली होती स्वप्नांची.. एक लगोरी
पण गनिमांचा या, तिलाच नेमके टिपण्याचा एक प्रयत्न होता.

-----------------------------------------------------------------
गझल -१
------------
या वास्तवाचाही स्वप्नांमध्येच, प्रवेशण्याचा एक प्रयत्न होता
अन माझ्याचमधला वेडा मी तो शोधण्याचा एक प्रयत्न होता?

तू म्हणतेस माझ्या डोळ्यातला तो दिवास्वप्नांचा भास होता.
पण मनातल्या या भूतकाळाला खोदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कटाक्ष केवढा लाघवी होता जो मनाला.. स्पर्शून गेला
का तुझाच तो ही, जादुगारी मन वेधण्याचा एक प्रयत्न होता ?

हरताना हा प्रत्यक डाव, हसलो मी.. विजयाच्याच उन्मादाने
पण संयमाने तो, दु:खास सुख संबोधण्याचा एक प्रयत्न होता.

मी बोललो स्पष्ट एकदा, चिरावे.. जसे विजेने अंधाराला
तो काळोखाच्या अवकाशालाच भेदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कोणता वसंत होता, जो फ़क्त तुझी.. स्वप्नेच घेऊन आला?
की, त्याचाही तो, काळीज माझे छेदण्याचा एक प्रयत्न होता?

गझल -२
----------
घाव दिले जगण्याने, तरी दु:खास.. उरण्याचा एक प्रयत्न होता
डाव गेले उलटून, तरी विजेता.. ठरण्याचा एक प्रयत्न होता

दोष दिला पायांनी, मातीस तरी.. या, काही न बोलल्या वाटा
घायाळ पायांचा तो, दु:ख हलके करण्याचा एक प्रयत्न होता.

हरवूनी मजला, जिंकण्याचा, तुझाही.. तो हर्ष केवढा होता
जो जिंकताना मी, तुझ्याचसाठी हरण्याचा एक प्रयत्न होता.

त्या निंदकांच्याच, सोबतीने, सदा राहीलो..मी याच कारणा
दोष काढुनी माझा सत्वापुरते उरण्याचा एक प्रयत्न होता.

त्सुनामीत तू, दिलास हात, वाटलो.. मीच एक ओळखीचा म्हणुनी
पण बुडताना मज कळले, तुझाच तो तरण्याचा एक प्रयत्न होता.

गझल -- ३
---------------
सुकलेल्या फ़ूला फ़ूलाला पुन्हा फ़ुलवण्याचा एक प्रयत्न होता
विझता विझता स्वत:लाच तो पुन्हा हसवण्याचा एक प्रयत्न होता.

कळून सारे, उगा पुन्हा मी हसताना, का तुला भासलो वेडा?
हे दु:ख विसरण्या, स्वत:लाही तो फ़सवण्याचा एक प्रयत्न होता.

शब्दाने वाढला शब्द जरी, वादाचा ना होता प्रश्न कुठे?
तू मला नि मी तुला हा आतून समजण्याचा एक प्रयत्न होता.

सत्य शोधण्या, वणवण फ़िरलो दशदिशा,तेंव्हा मजला कळून चुकले
कुठेच न्हवते त्या गाण्याला हा रुजवण्याचा एक प्रयत्न होता.

गायलेस तू मंजुळ गाणे परंतू माझ्याच मी भानात न्हवतो..
पुरात विस्कटल्या प्रवाहाला तो जुळवण्याचा एक प्रयत्न होता.

कुड

तुझं खरं की माझं खरं
मनाचा भुंगा जीवाला या
असं रोज कुरतडत राहतो.

सत्याचं -असत्याचं मनात
जुंपतं रोज तुंबळ... अन-
कुणीतरी अज्ञात रक्षस
सुखलेल्या या जख्मांना
पुन्हा फ़ोडत राहतो.

कसं ! जगावं तरी कसं?
बाहेरच्या या जगात
नाही कुणालाच कळत
असा मी का चिडत राहतो.

कुण्या जन्माच हे पाप,
कि, जगण्याचा हा शाप?
कुणी नसताना ही माझा मी
मलाच, का कुडत राहतो?

सैर बावरी

कोण जिव्हाळ ओढीने
कुठे हा मेघ धावतो?
वेथेत पिंज पिंजूनी
निरव थेंब सांडतो.

शितचंद्र ओल ती
धरेत खोल साचते
एकलेच कोण ते
बनात फूल वेचते?

स्मृतीत आज चांदणें
मंद मंद हासते
उर्मिलेस का तरी,
सुने सुने भासते?

काय दाटले उरी
धुंद धावते पदी
कंप पावते जळी
सैर बावरी नदी.

मने करुन फूलांची......!

लहानांसाठी कधी मने, करुन फ़ूलांची लहान व्हावे
उपकाराचे हात देऊन, मरणा अंती महान व्हावे.

सुख दु:खाची करुन वारी, गाणे येईल तुमच्या दारी
मंतरलेल्या शब्दांसाठी, कधी गाण्याची तहान व्हावे.

झाडाला कधी नसते दु:ख, काळजाला सांगून द्यावे
अन्यायात कधी दुर्बलांच्या तलवारीची सहाण व्हावे.

सांग कथा ती प्रत्यकाला, जय नावाच्या पराजयाची
लढणार्‍यास ही मौनाची भाषा त्यांची आव्हान व्हावे.

ना देता आले सुख कधी, तरी द्यावे असे दिलासे की,
आनंदाच्या अश्रूमध्ये सवंगड्याचे नहाण व्हावे.
--------------------------------------------------
कठिण शब्द येता :-----
..........................
सहाण = धार लावण्याचा दगड.
जय नावाचा पराजय = महाभारतावरील विष्लेशक कथेचा संदर्भ.
--------------------------------------------------

फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे

फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे
भोगावयास आले, नुसतेच हे उन्हाळे.

मेल्यावरीच येतो पाऊस आसवांचा
जगण्यात सांग कोठे लपतात हे जिव्हाळे?

वाकून चाल तू ही, लढण्यास जिंदगीशी
पाण्याखाली विनम्र झुकती जसे लव्हाळे.

नेकीने चालतो ही, सत्याची वाट अवघी
माझाच जीव मजला तरी पुन्हा न्यहाळे

जाता बुडूनी सांज पोटात सागराच्या
माझे अबोल गाणे पाण्यावरी खळाळे.

चित्तचोर

तू म्हणतेस मज, की, चित्तचोर मी
लोक म्हणती मज, असे बंडखोर मी.

दिसलो जरी असा, निर्विकार मी
असतो खोल आत, भावविभोर मी.

नाही दिप येथे, तुझ्या स्वागताला
काळजास केले, ही चंद्रकोर मी.

हास दु:खा उगाच, हास तुही आता
तुजसवे लावतो, पुन्हा एक जोर मी.

नको उगा बोलू, काही ही भलते
झाडाहून कसा, होईन थोर मी?

जरी तुझ्यासाठी, झालो मी बुजुर्ग
मनात एक उनाड, दडविले पोर मी.

'आम्ही'

पुढच्याला मागे खेचनारे आम्ही
विजेत्यांचे नांगे ठेचनारे आम्ही

नाही कुठेच आमच्या हक्काचा बाग
दुसर्‍याचीच फ़ूले वेचनारे आम्ही.

बुध्दीने काढतो निर्बुध्दांची सोंगे
अध्यात्माला दूर फ़ेकनारे आम्ही.

आम्हासाठी आणेल घबाड त्याच्या
सरणावरी हात शेकनारे आम्ही.

अंगात आमच्या बाणा कर्तव्याचा
दुबळ्यांची बोटे चेपनारे आम्ही.

मन


' प्रश्नांची पिशाच्च '

आज तरी कुणी जरा इकडे लक्ष देईल काय?
शकूनीच रक्त पुन्हा विमल करता येईल काय?

जिथे तिथे उभेच हे, मही- रावण- दुर्योधन
राम कॄष्ण बुध्दाला इथे जगता येईल काय?

अहिल्याच्या शिळेला आज देखिल वाटते भिती
साधुवानी रावण, रुप राघवी घेईल काय?

तुटलेली ही नाती आणि फाटलेली ही मनं
दुभंगल्या आकाशी आत्मा तरी जाईल काय?

प्रश्नांचीच पिशाच्च नाचतात माझ्या भोवती
कोणी मला त्यांची चोख उत्तरे देईल काय?

नाते तुझे नि माझे नाही खरोखरीचे

नाते तुझे नि माझे नाही खरोखरीचे
धर्माचे कर्म वेडे मानू बरोबरीचे.

येणे ही एकट्याचे जाणे ही एकट्याचे
गीतेत ज्ञान आहे सावळ्या श्रीहरीचे

येथे कुणी न बंधू सखा कुणी ना आता
नात्यात वैर झाले सार्‍या घरोघरीचे.

माझ्या तुझ्यात आता पडली कशास छाया?
कि, अंतर सांगते ती आता दरी दरीचे.

ओळख काय सांगू कसली तुला कुणाची,
काहीच नाव नसते स्वप्नातल्या परीचे.

कसा सोडवू गुंता माझ्या तुझ्या मनाचा?
झाले किती प्रयत्न माझ्या परोपरीचे.

विसरून दु:ख थोडे गझलेत या रमावे
घ्यावे भरुन प्याले माझ्या सुधाकरीचे.

' पाऊस गाणे '

का पाऊस वेडा गातो
दु:खाचे रिमझिम गाणे
कि मजला ए॓कू येते
ते गीत अनामिक मोने.

सजनीच्या कंठ सुरांचे
गुंफिले भाव तराणे
आभाळ आसवांसम ते
निळाईतूनी झरणे.

थेंबात गोठली येथे
मेघांची हुरहूर सारी
का रडते आभाळ्माया
माझ्याच येऊनी दारी?

छेडीत येई वारा
गवताच्या हिरव्या तारा
शोधीत मानसीचा
व्याकूळला किणारा.

भिजताना चिंब तरू हे
का झडती पानोंपानी?
रिघती मनात माझ्या
का हुरहूर पाऊस गाणी?

काढू नकोस ऐसे अंदाज या मनाचे

काढू नकोस ऐसे अंदाज या मनाचे
अवशेष फक्त येथे रक्ताळल्या रणाचे

गेले लढून होते येथे तुझे इशारे
सांगेल रक्त ते ही माझ्या कणाकणाचे.

गर्दी अमाप होती भुलली तुझ्या रुपाने
रेखून चित्र गेली डोळी तुझ्या तनाचे.

गर्दीत याच लफंगे साधून डाव गेले
झाले किती आघात माझ्यावरी जनाचे.

ए॓कून घे जराशी उठते इथे आरोळी
गारूड त्यात आहे माझ्या मुकेपणाचे.

येथे कुणी न रडला दु:खास माझ्या तेंव्हा
ते वाजत थेंब आले पझरल्या घनाचे.

अश्रूंच्या या पुराने वाहून आज न्हेले
मंजुळ गीत आपले वेळूतल्या बनाचे.

छेडू नकोस आता निर्भाव हे तराणे
झाले तसेही जगणे भिंगूरल्या क्षणाचे.

झाला उजेड वैरी अंधार शोधतो मी
ते विझवून टाक दिप न मवळल्या क्षणाचे.

आठवांचा हिंदोळा

तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा
व्याकुळला कसा आज संधीकाळ
हरवल्या क्षणांची फुले दिपमाळ

झर्‍यातून येई जुन्या दिवसाची हाक
असेल का आज तरी कुणी तिथे एक
तळ्याकाठी फांदीवर बोलावितो काक
अनाठायी उगा लागे जिवाला या धाक

कशा कधी उलगल्या मनातल्या गाठी
मोहरल्या पुन्हा चंद्र-बनातल्या भेटी
अजूनही प्रियकरा इथे तुझ्यासाठी
रोज एक स्वप्नतारा जळे माझ्या दिठी

हलताना संथ स्वैर बदकांच्या माळा
अजूनही साक्ष देई तो जलाशय निळा
तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा.

जे व्हायचे ते घडून गेले

जे व्हायचे ते घडून गेले
इथे पावसाळे रडून गेले.

कोण वाचतो शब्दास आता
ज्ञान ग्रंथात सडून गेले.

घातले दाणें जरी मुठीने
उपाशीच पक्षी उडून गेले.

माझी मी दिली कुर्‍हाड ज्यांना
माझ्याशीच ते लढून गेले.

रक्तावर पोसले तरु जरी
पानगळीत हे झडून गेले.

गर्दीत पाहीले सोयरे जे
नजरे समोरच दडून गेले.

किती सावरावं प्रत्यकाला?
आसवात गाव बुडून गेले.

गोष्ट चांदण्या नगरीची.

रात्रीच स्वछ निळं, पारदर्शी आभाळ. एका दुरवरच्या पोकळीतील उच्चश्राव्यावरून एक प्रखर चांदणी, आपली अलगद पावले टाकत स्थिरपणे खाली उतरते. तिच्या पाठी तिच्या शुभ्र वस्त्रांचा घोळ अस्थिरपणे थरथरत पायर्‍यांवरुन खाली सरकतो. तिची ही वस्त्रे विजेच्या तारांप्रमाणे शुभ्र- प्रखर असली तरी तिच्या डोळ्यात मात्र खोल कुठेतरी सांजेचा निस्तेजपणा आहे. मन व्याकुळ करणारा. ती नभोमंडपातील इतर तारकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागते. इतर तारकां ही तिला वाट करुन देतात. ती चांदणी मधेच एकदम थांबुन भिरभीर नजरेनं सगळीकडे पहाते. मग एका दिशेला दुरवर तिला दिसतं, काळोखाचा तो चंद्र आपली भली मोठी पाठ फिरवून मावळतीच्या दिशेनं निर्विकारपणे चालला आहे. चांदणीच्या निस्तेज डोळ्यात आता क्षणा क्षणाला काहीतरी हरवत चालल्याची भावना दाटून येतेय. तिचं मन हळुहळू उद्वीग्न होतय. त्या निळ्या पारदर्शी प्रकाशात तिची गौर कांती विझु लागलेल्या समईच्या जोतीप्रमाणे थरथरते. चंद्र मावळला तर रात्र संपेल आणि रात्र संपली तर या दु:ख भोगातुन केलेल्या कितीतरी दिवसांच्या, कितीतरी वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आलेलं प्रियकराच्या मिलनाच एक क्षणभंगुर सुख देखिल नाहीस होइल. या जाणिवेन तिचे बंद ओठ किंचित थरथरतात. आणि ते परदर्शी असलेलं स्वच्छ आभाळ आर्त सूरांनी भरुन जातं. त्या सूरावटीतूनच सरत्या रात्रीला आणि मावळत्या चंद्राला विनवणी करणार एक गीत उमठतं...........
रुक जा रात, ठेहेर जा रे चंदा
बिते ना मिलन की बेला |
आज चांदणी... की नगरी में.... अरमानों का मेला |
पेहेले मिलन की यादें लेकर
आयी है ये रात सुहानी
दोहराते है फिर ये सितारे
तेरी मेरी प्रेम कहानी......|
मनात लक्ष लक्ष भवतरंग उठवणार्‍या लतादिदींच्या या स्वरांनी वर वर्णीलेलं स्वप्न मला केंव्हाचं बहाल केलं होतं. चित्रपट- दिल एक मंदिर. या गाण्यात आपल्याला दिसते ती अप्रतिम देहबोली लाभलेली मिना कुमारी आणि राज कुमार. परंतु मी वर वर्णन केलेले हे स्वप्न हा चित्रपट पहाण्या आगोदरचे आहे. अशीच काही गाणी जी मनात काही पुर्व (अपुर्व) स्वप्न पेरूण जातात ती गाणी पुन्हा चित्रपट पाहूण मनाचा रसभंग करावसा वाटत नाही. पण या गाण्याने चित्रपटातही माझा फारसा रसभंग केला नाही. आजही हे गाणं ए॓कताना मिनाकुमारीचा यातनेनं व्याकुळ झालेला चेहरा आणि राजकुमारचा ए॓क वादळ उठुन गेल्याप्रमाणे दिसणारा भकास चेहरा मला आठवतो.
कल का डरना काल की चिंता
दो तन है मन,.. एक हमारा |
जीवन सिमा के आगे भी
आउंगी मै,.. संग तुम्हारे..........||२||
हे शब्द ए॓कताना मन जितकं सुखावतं तितक्याच यातनाही होतात. एकवेळ आकाशाची सिमारेषा ते क्षितिज सांगतील. पण प्रेमाची ? जे मानवी जीवनाच्या सिमे पलीकडे जाऊ शकतं. जे आकाशाला ही कवेत घेऊ शकतं.
----------------------------------------
लता मंगेशकर.
ए॓कूण तुझे हे गाणे स्वप्नात हरवलो मी
विसरलोच जगाला पण माझा ही न उरलो मी.

मी येण्या आधी येथे

मी येण्या आधी येथे, मला कधी ना कळले होते
प्रत्यकाचे हात इथे पापधुळीने मळले होते.

शाळेत शिकलो एक अन् जगी पाहीले दुजेच काही
अज्ञानाचेच दळण येथे सज्ञानाने दळले होते.

नशा, वासना, लाचारी पैशाचे हे मंगळ येथे
चंगळ पाहुन मन माझे, कधी जराशी चळले होते.

सभ्यतेवर थुंकूण जेंव्हा जुगार्‍याचा डाव मांडला,
मागुन आल्या शब्दांनीच मनास तेंव्हा छळले होते.

विसरुण या जगास आता स्वप्नात रमणे ठरले पण,
मनात माझ्या स्वप्नांचे गावच अवघे जळले होते.

कशासाठी कुणी ही भांडू नका रे

कशासाठी कुणी ही भांडू नका रे
उगाच हा खेळ असा मांडू नका रे.

सुंदर हे जग आहे, नासू नका रे
माणसात दैत्यासम भासू नका रे.

कुणास ही कुणी शिव्या मोजू नका रे
दगडाला देव म्हणुन भजू नका रे

मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका रे
सत्वालाही डाग कधी लावु नका रे.

हसणारी कळी कधी तोडू नका रे
कुणाचे ही सुख कधी ओढू नका रे

दुजासाठी दुजे होत नडू नका रे
स्वतःसाठी स्वतःच रडू नका रे.

जोडलेल्या नात्यास तोडू नका रे
माणसात माणुसकी सोडू नका रे.

शब्दांवर माझ्या असे चिडू नका रे
सोडताना श्वास मला भिडू नका रे.

सांज

येता भरुन आभाळ
उठे शब्दांचे वादळ
घुंगूरले मन होय व्याकूळ व्याकूळ.

सारे कल्पनेचे भास
तरी लागते का आस ?
रंगवेडी सांज होते उदास उदास.

वारा खेळे अंगणात
बोले पाखरु तृणात
कोकीळेच गाणं हिरव्या पानात पानात.

काजळले निळे पाणी
थरारली पापणी
आठवते जुने काही पुन्हा फ़िरुन फ़िरुन.

जेंव्हा उतरली रात
हले चांदणे पाण्यात
देई मोर केका दूर बनात बनात.

घुमे घुबड रानात
भरे काहूर मनात
दडुनीया गेली सांज खोल पाण्यात पाण्यात.

एकांतात तुझे गाणें

एकांतात तुझे गाणें स्फुराया लागले
तुझ्याविना स्वप्नातच मन मुराया लागले.

अबोल्या या मनाची जणु ओळखुन भाषा
झाड-झाड माझ्यासवे बोलाया लागले.

लपविले किती जरी मी डोळ्यातले पाणी
फूल-फूल नजर माझी निरखाया लागले.

आसवांत चमकली शुभ्र तारकांची माळ
चांदणें ही माझ्यासवे हसाया लागले.

एकटाच आलो मी आता एकटेच जाणे
खोल खोल आत हे आता रुजाया लागले.

प्रेमाचं सोंग - विडंबन

तुझ्यासाठी भोगतो दुरावं मी किती
सांग तुझ्या प्रेमात झुरावं मी किती.

सांगतेस नड तुझी रोज एक नवी
दिसामाजी दिस गेले उरावं मी किती.

आठवांत रोज तुझ्या मुरावं मी किती
जगण्यात माझ्या तरी नुरावं मी किती.

काय बये प्रेम तुझं सोंगाड्याच्या गती
तुझा हात म्हणुन फूल चुरावं मी किती.

कासवाची चाल तुला लावू कशी गती?
तुझ्यासाठी आणू आता पुरावं मी किती?

पाऊस आणि मन

छेडीतो सतार, इंद्राचा गंधार
झुले मेघमल्हार, देऊन हूंकार.

ओथंबले मेघ, कोसळल्या धारा,
ओलावली माती, गंधाळला वारा.

खळाळले पाणी, ओसंडला पुर
धुंदावल्या कळ्या, नाचु लागे मोर.

उसवले मन, आठवला पुर
उलगल्या गाठी, सुठे गुंतलेले दोर.

गजबजले पार, मनातले घर
उघडता दार, गेली उडून पाखरं.

---------------------------------------------
पुर्व प्रसिध्दी :- दिवाळी अंक ' प्रतिभा' २००८
---------------------------------------------

तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते

चालताना पाठी तुझ्या रुणूझुणू नाद ते,
काय सांगू तुला सखी नवल आज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

गडणीला साजणी तू काय लाजते?
खोल जरा मनातले तुझ्या राज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

चंद्रमौळी म्हणेल तो स्वर्गलोक तुला,
इंद्राणीची चाल तुला गजब साधते.
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

काय सांगू अदा तिची घायाळल्या वाटा,
शृंगाराचे साज तिचे नखरेबाज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते

काय सांगू तुला सखी नवल आज ते,
तुझ्या पैंजणात माझी गझल वाजते.

तहानलेल्या उन्हामध्ये पावसाची सर,
अमृताची धार जणू सुजल पाजते.

दुर गेले सूर तुझ्या पायांसवे तरी,
धावतात भास मजल दरमजल आज ते.

जीवाशी या खेळतात खेळ रांगडा,
रुणूझुणू सूर तुझे दगलबाज ते.
 
जुने ग तू टाक आता नवे ऋतू आले,
शृंगाराचे तुझ्या सखी बदल साज ते

लेखणीच्या या तलवारीने....!

लेखणीच्या या तलवारीने झुंजायाला शिकलो मी.
नशिबाशी या भांडायाला कधीच नाही थकलो मी.

जगण्याच्या या जुगारात ही किती भेटले छक्के-पंजे
ठगांच्या त्या कुट नितीला कधीच नाही चकलो मी.

आजही पडल्या उघडया येथे तू दिलेल्या जख्मा
आळ येऊनी अपराधाचे कधीच नाही लपलो मी.

एकाकी मज पाहून कधी आली वादळे अंगावरती
तक्त मोडले जिद्दीचे ना कधीच नाही खचलो मी.

एकच होते गुपित माझे आज सांगतो तुला,
जगूण मरणे भोगताना खुल्या दिलाने हसलो मी.

जुन्या दिसाचे गोड गाणे

जुन्या दिसाचे गोड गाणे आज घडीला उरले नाही.
नात्यांमधले प्रेम ही आता अडीनडीला उरले नाही.

जिकडे तिकडे उजाड झाले, हे लाल- तांबडे रान.
झाडावरती पान ही आता पानझडीला उरले नाही.

भातुकलीच्या खेळामधले कुठे हरवले रुसवे फुगवें?
बालपणीचे सौख्य ही आता सवंगडीला उरले नाही.

काळासंगे मने आतुनी माळावाणी भकास झाली.
कोसळावे काही आत,असेही आता पडझडीला उरले नाही.

दु:ख घेउनी जो तो पळतो आप-आपुल्या सौख्यापाठी
डोळ्यामधले पाणी आता रडारडीला उरले नाही.

' शब्दांच्या या ढिगार्‍यात.....!'

तुला वाटले मी शूर होतो.
दु:खापासुनी मी दुर होतो.

असले जरी हे शाबुत खांदे,
दैवाचा, घोडा कुणास फितूर होतो?

जिंकला नाही मी आखाडा,
तरी खलांना, भयाचा मी पुर होतो.

तुला वाटले सुखाचा मी सूर होतो.
शब्दाविना तसा मी निसूर होतो.

तु मागतेस दान चांदण्यांचे.
तेंव्हाच कसा चंद्र, निष्ठूर होतो?

कधी माझ्याचवरचा राग ही,
तुझ्या रूपाचा चांदणी नूर होतो.

दु:खाशी लढणारा नि:शस्त्र मी विर होतो.
अन् तुला वाटले अजिंक्य मी शूर होतो.

स्वप्नातल्या त्या मुलूखाचा मी वजीर होतो.
शाश्वताच्या जगापासूनी मी दूर होतो.

खरेतर, जगावेगळा वेडा मी पिर होतो.
शब्दांच्या या ढिगार्‍यात माझाच मी चूर होतो.

व्हि. शान्ताराम यान्चा - सरताज

आज कालच्या युवा पिढीला जुने चित्रपट - जुनी गाणी फारशी माहीत नसतात. रिमीक्स, डि.जे. च्या ग्ल्यॉमर
दुनियेत सारेजन गुरफटुन जात आहेत. परन्तु अनेक जुने भारतीय चित्रपट याच ग्ल्यॉमर दुनियेला आज देखिल
पुन्हा आठवल्या शिवाय रहात नाहीत. कारण ते आहेत काळाच्या पडद्यावर बांधलेले अप्रतिम सरताज.....
असच एकदा "दो आखें बारह हाथ" हा व्ही. शान्ताराम यांचा चित्रपट पहात होतो. कुठेतरी वाचल होत चांगला
आहे म्हणुन. पण डोळ्यांना रंगीत ग्ल्यॉमरची सवय, आणि ब्लॅक एन व्हाइट पहाताना ते सुरुवतिलच थकले.
एक ऑफिसर(व्हि.शान्ताराम) सहा कैद्यांना पुर्ववत माणसात आणुन सुधारना करन्याची हमी घेतो, व त्यांना घेउन एका ओसाड
माळरानी शेती कसन्याच्या उध्देशाने येतो. हे पहाताना खुपच बोरिंग अस् वाटलं, आता पुढे काय असेल फार तर
पळुन जाण्यासाठी कैद्यांनी केलेली मारामारी ईतकच. परन्तु शेतीची मशागत करुन दमलेले कैदी परत घरी येतात
आणि अचानक एक गोड स्वर कानावर येतो.....
ओs ओss ओsओओ SSssssssss
सैय्या झूटॉ का बडा सरताज निकला..
हाय हाय... वसन्त देसाई यांचे संगीत,भरत व्यासांचे शब्द आणि लताचा सूरेल आवज.क्षणार्धात सारा थकवा कुठल्या कूठे निघुन जातो.
आणि आपन आळस देत पडलो असताना उठून बसतो. संध्या या अभिनेत्रिचं सुरांच्या ठेक्यवर अंग हिन्द्कळत चालनं, आणि चालता-चालता मागे अडकवलेल्या कात्यान्च्या छडीचा आवाज. हे गाणं आपण मन्त्रमुग्ध होऊन पहत रहातो.
कन्टाळा आला असतानाच एका नव्या कॅरेक्टर(चम्पा) ची एन्ट्री होते व पुढचे एपीसोड पहाण्याची ओढ लावनारा नवा खेळ सूरु होतो. हि चम्पा नेहमीच येता -जाता हे गाणं म्हणत असते,
सैय्या झूठों का बडा सरताज निकला
मुझे छोड चला, मुख मोड चला.....!
नंतर राहुन राहुन असं वाटत की खरंच या बिच्यार्‍या चम्पाला तिचा जिवनसाथी सोडुन गेला असेल का?
आणि का बरं गेला असेल? आपल्या जिवलग प्रेयसीला असं एकाकी सोडून जाणं म्हणजे किती यातनमय आहे,
हे त्याला का कळू नये?

माझ्यासंगे देव बोलला नाही

माझ्यासंगे देव बोलला नाही,
नियतीने तराजू तोलला नाही.

धरावी कोणती वाट आता,
फकीर एकही बोलला नाही.

आत्मपिडा ही घेऊन चाललो.
तुला हुंदका पेलला नाही.

आयुषा दे,हवे तेवढे घाव आता,
मी अजुन आत्मा सोलला नाही.

फुंकून पुंगी गेले,कित्येक गारूडी,
मनाचा भुजंग या डोलला नाही.

सांभाळ नशिबा, तू स्वतःला,
जख्मांचा हिशेब मी ही सोडला नाही.

भूल..........!

मंद पावसाचा
रुणुझुणू ताल,
नाद पैंजणाचा
तुझे मित बोल.

मनास ही माझ्या
पडे कशी भुल,
तुझ्या लोचनात
किती जावे खोल.

आभाळात माझ्या
चांदण्याची झुल,
लख्ख त्यात तू ही
एक चंद्र फुल.

स्पर्श चंदनाचा
भाव ते मलुल,
श्वास गंधकाचा
सांडतो विपुल.

वेडावले मन
फिरे गोल गोल,
जशी पाखराला
पडे रानभुल.

फसवणूक

इथे कधी कुणीच नसतं कुणाचं.
तरी असतं धाग्याला धागा जोडुन जगायचं

कधी कुठेच नसतं काही स्वतःच.
तरी का हरवलं काही माझं म्हणुन रडायच?

जन्मापासून असतं अखेर म्रुत्युकडेच चालायच.
तरी आयुष्य हे सजवायास पुन्हा पुन्हा झटायच.

आसवांना घालून बांध असतं थोडं हसायचं
आयुष्यभर स्वतःला, स्वत:च असत फसवयच.

असंभव

असंभव जगण्याला, चुचकारते आहे मरण.
पारध्याच्या वेधाने, चित्कारते आहे हरण.

अरे कुठे गेले ते पांडव सारे,लढवैय्ये?
पैशावरती बळाचे येथे,होते आहे हरण.

येऊ नको रे हरिश्चंद्रा,वध होईल तुझा.
सत्तेला ही सत्व येथे जाते आहे शरण.

रक्ताळलेले गिधाड,भयभीत होऊन कलकलले,
दयावान बुध्दाचेही,रचले, जाते आहे सरण.

आसवांवर तुझ्या अता विश्वास तरी कसा ठेऊ?
इथे सैतान ही अंभंगाचे गाते आहे चरण.

कोणी हसून गेले

कोणी हसून गेले, कोणी रडून गेले,
झगडले जया पोटी, ते सारे इथेच सोडून गेले.

परवाच्याच त्या मैफलीत, सारे भिडू ते होते दंग,
वादळ ऊठल्या कवालीचे ते, गाणे आज विरून गेले.

कोण नाही बंदी येथे? सारेच प्यादे बांधलेले.
तु ही एक त्यातलाच, जन्म त्यांचे सांगून गेले.

जो तो त्याच्या जिवनाचा, असे एक कर्मभोगी.
तरी प्रतिक्षा का त्याची, जे हातून या सुटून गेले.

कोणी हसून गेले जरी का, तुला कशास चिंता?
दैव त्याचे तया भाळी, कर्म आहे लिहून गेले.

कशास ही आता, तु न रडावे, न झगडावे.
आहे तेच जाणावे, दैव आपुले, दान सुखाचे टाकून गेले.

मौसम है आशिकाना....!

     <strong>क</strong>धी कधी सगळं कही अगदी झक्कास असत.छानसी संध्याकळ होऊन निळ्या
आकाश्याच क्षितिज केशराच्या तेजस्वी रंगाने मखलेलं असत.बावरी सांज चोरट्या पवलांनी चालत येऊ लागते,
आणि अंगाला सुखद स्पर्श करनारा मंद वारा वहत असतो.आशा शांत वातावरणात कुठेतरी ऊंच झोके घेणार्‍या
पक्षांचा आवाज नाहीतर रानपाखरांची किलबिल ही ए॓कू येते.
       असं सारं कही गोड- मनोहारी असतं. पण तरी उगाचच मनात कुठूनशी ए॓क हुरहूर दाठून येते.निळ्या शांत
जलाशयावर वार्‍याच्या स्पर्शाने तरंग उठावेत तसं मनात काहीसं हलू लागत.आणि वाटतं खरंच आशा वेळी आता
कुणीतरी आसायला हवं होतं. कोणीतरी.....! आपल्या आवडीचं, अगदी आपल्या र्‍हुदयाच्या जवळच.शतजन्मातून
ए॓कदा भेटणारं तरी आपल्यावर मनोमन असं  प्रेम करणारं.
      पण असं फक्त वाटत रहातं. जवळ कोणीच नसतं.मन वार्‍याच्या झुळकीप्रमाणे दिशाहीन होतं.आपण स्वतःला
सावरू पहातो.अशा गोड संध्याकाळी कोणीतरी असावं असं वाटत असतं पण कोणी ही नसतं हे सत्य मनोमन जाणुन
ते विसरण्यासाठी आपण हळुहळू कहीतरी गुणगूणु लागतो, आणि मग ए॓काकी विरहातून आपल्याला स्वप्नांच्या
नगरीत न्हेणारी स्वरांची पायवाट सापडते.......

                                                   मौसम है आशिकाना
                                                    ए॓ दिल कहीसे उनको
                                                    ए॓सेमें ढुंड लाना  |
                                                    मौसम है आशिकाना...............||

        मधाचा गोडवा असलेला, लता या गानकोकीळेचा आवाज, नौशाद- गुलाम मोहम्मद चं संगीत आणि कमल
आमरोहीचे शब्द (चित्रपट-पाकिझा) आपल्या उदास मनाची साथ देऊ लागतात.

    अशीच ए॓क एकाकी विरहात बुडालेली प्रेयसी आपल्या प्रियकराला घेऊन येण्यासाठी स्वःताच्याच मनाला
आळवतेय,.......

                                               केहेना के ॠत जवां है
                                               और हम तरस रहे है
                                               डर है ना मार डाले
                                              सावन का क्या ठिकाना
                                               मौसम है आशिकाना.................||

   खरं तर गीत लेखन ही ए॓क गीतकाराला मिळालेली दैवी देणगीच असते हा प्रत्यय आशाच काही आशयातून
कधी अचनक पहयला मिळतो,
                                             तुमको पुकारते है
                                              ये गेसूओं के साये
                                             आ जाओं मै बना लु
                                             पलकों का शामियाना
                                              मौसम है आशिकाना...................||
पलकों का शामियाना बनवणारी ही प्रेयसी, आपल्या जीवन साथीवर किती तरी प्रेम करत असेल,..नाही?

<img src="/files/u35115/Pakeezahaudio.jpg" width="190" height="288" alt="Pakeezahaudio.jpg" />

र्‍हुदयास मोगर्‍याचा, बेधुंद गंध आला

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
र्‍हुदयास मोगर्‍याचा, बेधुंद गंध आला.

झिडकारूनी मी थकलो, दु:खाच्या सावटाला,
कळलेच नाही मजला, पावलो कसा सुखाला.

शब्दांच्या पालखीला, घेऊनी दुत आला,
बेफाम वेदनांच्या, झाल्या कित्येक गझला.

माझ्या अबोल ओठी, गंधर्व स्वर आला,
धुंदीत मुक्त जगावे, सांगून आज गेला.

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
अंधार काळजाचा, दैदिप्य चंद्र झाला.

उजळुन आज आले, माझ्या दश-दिशेला,
शब्दांचे चांदणे हे, भेटे मला चातकाला.

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
अवचित या जगाचा, संबंध साफ तुटला.

माझाच एकटा मी, मांडुन खेळ बसला,
अन र्‍हुदयास मोगर्‍याचा, बेधुंद गंध आला.

"शपथ तुला....!"

कोण जाणें, अपराध माझा असा काय झाला,
आयुष्यातून, नजर पाडून चंद्र वेडा निघून गेला.

वाटेवरती आज डोळे, र्‍हुदयाचा ही दिवा झाला.
परतीच्या ना खूणा उमठल्या,भरतीचा मग पाऊस आला.

दर्याचा ही सुना किणारा ओळखुण गेला, माझा अबोला,
मलाच पुसती सागर लाटा, ए॓कलीच का या घडीला?

झाडे- वेली, पान-फुले सारेच येथे जाणुन मजला,
जाई तिकडे खाणा-खुणा अन प्रेमाच्या त्या नि:शब्द गझला.

र्‍हुदयाची ती एक प्रिया, हाक दे रे पुन्हा मला,
शपथ तुला माझी आहे, ना ऊरेण पुन्हा मी आपराधाला.

गझल एकच होऊ दे

तुझ्या माझ्या श्वासांची गझल एकच होऊ दे,
शब्द सुरांच्या वळीवात मला आज न्हाऊ दे.
 
नव्या प्रितीची नवी रित आम जगात वाढू दे,
दान देणार्‍या दैवाचे ही मला पांग फेडू दे.
 
शब्दांच्या या झुल्यावरून आभाळ कवेत घेऊ दे,
सुर्यासमान कणा कणाने अग्नीकुंडात जळु दे.
 
गझल धुंद मी असा, मज स्वरासंगे जाऊ दे,
साखळलेल्या दु:खाला ही प्रवाहात वाहू दे.
 
भलत्या-सलत्या स्वप्नांची ही मुळं आज शोधू दे,
दु:खावरचा दवा अशी, गझल एकच होऊ दे.

नाते तुझे नी माझे

आलीस घेऊनी येथे, तू काळजाच्या वेदनेला,
मागे खुळ्या बघ्यांचा, जथ्थाच एक आला.

फाटके नशिब होते, झिजण्यात जन्म गेला,
रक्ताचे पेरले थेंब, परी नाही वसंत फुलला

दु:खात ही हसावे, गिळुनी दु:ख हुंदक्याला,
शिकवलेस तू ही, गा तुझ्या जीवनाला.

निर्मळ जलाची धारा, नाते तुझे नी माझे,
पाठी खुळ्या जगाने, भलताच अर्थ केला.

आंदण मी दिले जे, माझे तुला आभाळ,
अफवेस आज त्यांना, अपवाद एक झाला.

तुझ्या नी माझ्या भोवती, नजरेची बंदीशाळा,
छेडण्यास मुक्त त्यांना, हा भलताच छंद झाला.

आक्रित

काय सांगु देवा तुला, आज इथे आक्रित घडले,
माणसांच्या या जगात, माणुस शोधण्याचे भलतेच हे काम आले.

प्रत्यकाच्या काळजाला हात घालुन, निरखुन पाहीले,
पण सारेच कसे कोण जाणें, माळावरचे दगड निघले.

चेहर्‍यावरती नकाब चढवून, काळोखचे फकीर आले,
दैवाचेच दुत म्हणुन, रक्त पिऊन निघून गेले.

काय सांगू देवा तुला, आज इथे आक्रित घडले,
जिंकण्यासाठी जागो-जाग दुताचे ही डाव पडले.

आडाणीच लेकरू तुझे, कोल्ह्याहून हुशार झाले,
हसणाराचे काळीज चोरून अंधारात पशार झाले.

सत्यासाठी मेले त्यांना, अमरतेचे इनाम दिले,
मांसासाठी भांडणारे लांड्गेच कसे मागे उरले.

काय सांगू देवा तुला, ईथे कुणासाठी कोण मेले,
भुकेलेल्या गिधाडांचेच आज ईथे स्मशान झाले.

"दुष्काळाचा गाव आमचा "


दुष्काळाचा गाव आमचा, वेशीवरती मरण टांगले.

तहानलेलेच जीव तरी जगण्यासाठी मुठीत बांधले.


पाण्याच्या या थेंबापायी जगणे येथे मरण झाले,

हिजड्यांच्या का राजकारणात पावसाळे ही सामिल झाले?


पांढरपेशी पुढार्‍यांच्या शब्दावाटेच सुकाळ आले,

तसे मेघांचे ही हत्ती निळे, मुकाटपणे झुलून गेले.


आठवता आठवत नाही हे कुण्या जन्माचे पाप झाले,

टोपीवाले माकड देखिल इथे आमचे बाप झाले.