साहित्य प्रकार

Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, September 20, 2012

देवा...!

देवा...!
तुझ्यापाठी माझा काहीच त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसात जागा नाही.

फुटपातवरही कोणी माणसच असतात    
नि, काचबंगल्यातही माणसच असतात
जी एकाच नभाखाली एकाच जगात रहातात
पण एकत्र असूनही ती एकमेकात मिसळलेली का नसतात?

देवा...!
धरतीला जसा अगम्य रंग चढवलास
तसा इथे प्रत्येकालाच वेगळा घडवलास.

त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.

Friday, September 14, 2012

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे

डोळ्यांनी डोळ्यांशीच बोलावे
मनाचे गुज मुक्यानेच खोलावे.

नाते नभाशी आपसूक जुळावे
पापणीने पावसा पापणीत तोलावे.

कधी वर्दळीच्या सोडून वाटा
स्वत:स शोधत एकाकीच चालावे

कधी तू मला अन मी तूला ही,
केवळ एका स्पर्शानेच आकळावे.

असो कोणताही ऋतू परंतू,
नाते हे मनामनात दरवळावे

शब्दांच्या मी वादळातला एक नारा.


अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

मायबोली


सळसळूनी शब्दगाणी बोलताती झाड वेली.
अमृताहून जीवनाच्या गोड माझी मायबोली

नादब्रम्ह साचलेली जेथ आहे गहन खोली
अर्थगर्भ जीवनाचा सांगते ही मायबोली.

माय माझी बोलली जी, तिच मी ही शिकलेली
बोबडा मी बोलताना मित झाली मायबोली.

बाळबोध जिवणीशी एकदा मी बांधलेली.
तिच आज बोलतो मी काळजाची मायबोली.

परभाषी पावसाची झड आली झड गेली
तोलली मी वादळात एक माझी मायबोली.

चोखळोनी पैस सारा ज्ञानदेवे रचियेली
माऊलीची साऊली ही शब्दरुप मायबोली.

चंद्र


ओंठांत गंजल्या माझ्या
मी मंत्र बांधले होते.
दोघात नदीच्या काठी
आधी कोण बोलले होते?

ते गीत सांज उन्हांचे
या देहात मुरले होते.
दोघांच्या अबोलपणी ते
सांग कुणी गायले होते?

पाण्यात उतरता शेजा
मी स्वप्न सांधले होते.
सोडून हात तू जाता,
का परतून पाहीले होते?

तू चंद्र व्हावेस माझा म्हणूनी,
मी सुर्य लोटले होते.
’वेड्या!’ गौर केतकी माझे,
मी हात पोळले होते.

आई


जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

अंतर


हे असं नेहमीच कसं जादूमंतर होतं
सारं ज्ञान वेळ निघून गेल्यानंतर होतं

तो समाज ही एक आरसा होता भिववणारा
तसं तुझ्या माझ्यात ते कितीसं अंतर होतं?

त्या दिवशी तू पहीलेलं अतीभव्य वादळ
हे देखिल माझ्याच मनाच एक अवांतर होतं

आणि आज पहाटे मी पाहीलेलं ते स्वप्न
हे तुझ्या येण्यासारखच काव्यमंतर होतं.

काळीज पोखरुन स्वप्नांनीच जागा केली
तसं तुझ्याशिवाय हे जगणंच निरंतर होतं.

या भरल्या कळपातून कुठेतरी दूर जाणं
हेच फक्त आता शेवटचं गत्यंतर होतं .

गुलमोहराचे रान


हृदयाच्या त्या शब्दासाठी हरवून सारे भान.
होते कधीचे अतुरलेले माझे हळवे कान

अवचित आले तुझ्याकडूनी होकाराचे दान
आणि माझ्या मनात फ़ुलले गुलमोहराचे रान

तुझ्या वाचुनी भासत होती सृष्टी ही निशप्राण
तुला पाहता चराचराला क्षणात आला प्राण

रुप आगळे तुझे साजणी लावण्याची खाण
लपून पाहे फ़ूलांअडूनी वेलीवरचे पान.

कशास करशी रुप सोहळे,लावूनी दिपमाळ?
उठून दिसते चांदण्यात ही तुझे चांदणी वाण

वाजत येई वाटेवरूनी ऋतू ऋतूंचे गाण
आपण दोघे सहप्रवासी दिगंतराचे छान

कशास करशी उगाच चिंता हरून सारे त्राण?
जगणे माझे तुझ्याचसाठी शतजन्माची आन.

काळजात या अजून आहे तुझ्या स्मृतींचे पान
गतकाळाचे क्षण गुलाबी मांडून बसले ठान

असेल कोण राजा त्याचा ताज असूदे महान
भातुकलीची दिवली सुध्दा अमर प्रीतीची शान

लक्ष फूलांनी जरी बहरले दिशा दिशांचे रान,
आधी वेचण्या सुधाकरी फूलराणीचा मान.

ओळख


तू असा आहेस, तू तसा आहेस,
मतानुसार जो तो बोलला.
पण पुरेपूर कोण ओळखतो कुणाला?

कधीतरी सांगता येईल तुला?
कोणता रंग असतो उन्हाला?

निदान, हे तरी सांग मला!
आयुष्याचा कोण झुलवतो झुला?

नाव हीच ओळख असते प्रत्यकाला,
तसा पुरेपूर कोण ओळखतो कुणाला?

इथे तर माझाच मी ओळखत नाही मला.

अज्ञाताच्या वाटेवर...........!


चल!.. आज नव्या वाटेने जाऊ,
जिथे असतील कळ्या ही उत्सूक,
गंध सांडून फूलण्यासाठी.
काट्यांचं ही दु:खं विसरून,
तुझ्या माझ्यासाठी.

अंगावर ऊठवाया पावलांची नक्षी,
अतूर असतील वाटा,
अन उर फोडून नाचत असतील,
ओढ लागलेल्या पाणलाटा.

खाली वाकलं असेल आभाळ,
जिथे रंग निळा घेऊन,
फक्त तुझ्या माझ्यासाठी.
तेथेच घडूदे आज एकदा
या हृदयाच्या गाठीभेटी.

ओसाड असलं रान तरी,
जे देईल अंतराची हाक
अनवाणीच जाऊ तिथे,
पावलावरती पाऊल टाक.

गुंतवून घेऊ पायात,
आडव्या तिडव्या वाटा,
रुतला जरी काटा,
वहिवाटेला देऊ फाटा.

मिसळून जाऊ एकमेकात,
स्वच्छ उन्हाच्या मृगजळात.
सावल्या ठेवू कोरून,
भिरभीरणार्‍या डोळ्यात.

आभाळाचा संधीप्रकाश
असेल जिथे गोठलेला.
गाणे गात जगत असेल,
अश्वथ ही पिळवटलेला.

चल.. जाऊ आज तिथे,
जिथे येईल मेघ उतरून,
गंध घेऊन सौख्याचा.
अन दु:खाचे ही गीत होऊन,
गाव लागेल आनंदाचा.

सांजकाळी कशी दाटते


सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.

सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.

दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.

नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर

भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.

मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.

किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर

कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर.

धोटं


तुला खरं सांगू का?
मी अंधारात असलो तरी,
शब्दच विजा घेऊन येतात.
अन माझी चराम आसवं
ओळी ओळीत लखलखतात

मी नेहमीच हसतो,
याचं तुला नेहमीच कोडं!
पण तुला का ठाऊक,
मनात असतं दु:खही थोडं

लोक म्हणतात मला,
मी जगावेगळा वेडा,
पण खरे कुणास ठावे?
मी तर एक पुस्तकी किडा.

आता तू म्हणशील,
काय खरं नि काय खोटं!
माणसं तर जगतात,
भरायला नुसती पोटं.

कधी कुणी म्हणतं
सत्य ही असतं खोटं
यावर तुच सांग आता,
किती वाजवायचं मी
उगा सत्याचं धोटं