साहित्य प्रकार

Friday, September 14, 2012

सांजकाळी कशी दाटते


सांजकाळी कशी दाटते,मनात माझ्या हुरहूर.
कुण्याकाळचा फ़िरुनी येतो,जुन्या स्मृतींचा पूर.

सागराची लाट जणू रुद्र त्सूनामी वादळाची
किती आवरू किती सावरू सये फ़ुटून जातो उर.

दिलीस जेंव्हा हसूनी मजला खोटी वचने तेंव्हा
स्वप्नभूलीत घोड्यानेही चौखूर उधळले खूर.

नेहमीच असतो तसाच आहे आजही येथे मी
तरी आरसा कशास दावी हा जगावेगळा नूर

भूत-भविष्या मध्ये अडकला,क्षणभराचा वर्तमान
किती चाललो तरी रिकामा वाट जाते दूर दूर.

मुक्या जिवाचा मुक्या मनाशी मुकेपणी रोज तंटा
कधी यायचा तुझ्या नि माझ्या गाण्याला एक सूर.

किती चाललो जपून होतो तरीही लागली ठेच
नशीब मेले असेच जाते देऊन हतावर तूर

कुणी कसेही बोलून गेले नि दिले जिव्हारी घाव
किती भोगले अन सोसले असताना मी बेकसूर.

फाटक्या या आयुष्याला


फाटक्या या आयुष्याला शब्दांचाच साज आहे.
मांडतो ती गजल माझ्या अंतराची गाज आहे.

लंगड्याची चाल होते, वेदनेचे फूल होते
अंतरी ते काय असे शब्दामाजी राज आहे?

माणसे ना सोसती जे, सोसती ते शब्द सारे
मांडण्यास तया नग्नता का कुणाची लाज आहे?

गुंग होतो शब्दयामी विसरूनी या जगा मी
शब्दवेड्या जीवनाचा आगळा हा बाज आहे.

झिंगली जी पिऊनीया, शब्दांची ही 'सुधाकरी'
शब्दवेड्या त्या पिढीचा आज मजला नाज आहे.

ना माणसात माणूस


ना माणसात माणूस, ना घरात घरपण उरले
का अश्मयुगाचे पुन्हा, हे आदिम वारे फिरले?

बगल देऊनी जाती, ते सगे सोयरे सारे
नात्यांचे तरी धागे, मी उगाच ताणून धरले

अंक नाटकासारखे, हे जगणे तुझे नि माझे
ऐलापासून पैला, जग सोंगाड्यांनी भरले

ना आभाळ माझे हे, ना तुझे चांदणे तेही.
आलो होतो मोकळे, अन तसेच जाणे ठरले.

ते गीत सुधाकरीचे का कुणास नाही कळले?
गाणार्‍याचे गीतही, का असेच जगणे सरले?

धोटं


तुला खरं सांगू का?
मी अंधारात असलो तरी,
शब्दच विजा घेऊन येतात.
अन माझी चराम आसवं
ओळी ओळीत लखलखतात

मी नेहमीच हसतो,
याचं तुला नेहमीच कोडं!
पण तुला का ठाऊक,
मनात असतं दु:खही थोडं

लोक म्हणतात मला,
मी जगावेगळा वेडा,
पण खरे कुणास ठावे?
मी तर एक पुस्तकी किडा.

आता तू म्हणशील,
काय खरं नि काय खोटं!
माणसं तर जगतात,
भरायला नुसती पोटं.

कधी कुणी म्हणतं
सत्य ही असतं खोटं
यावर तुच सांग आता,
किती वाजवायचं मी
उगा सत्याचं धोटं

फू बाय फू... फुगडी गं फुगडी


कविता गझला झाल्या नुसत्या बेगडी गं बेगडी
काय करावे मला कळेना, कसे वाचावे मला कळेना
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥१॥

जशी नेसावी नवंवधूने रोज नवी नवीच लुगडी
तशा या गझला तशा कविता रोजच येती घडोघडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥२॥

एकच असतो गोमटा पण माबोलीवर किती आयडी
नेम नाही इथे कुणाचा कधी कुणाची फिरेल गाडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी ----------॥३॥

झुक झुक झुक झुक फिरते शब्दांची ही रेलगाडी
काय सांगावे कधी इथे उडेल कुणाची रेवडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी. -----------॥४॥

प्रतिसादाच्या अंगणी कुणी रोज घालते लंगडी
शब्दांच्या मग झाडून फैरी राख सांडते शेगडी
शब्दासंगे डोळे नुसते रोज खेळती फुगडी गं फुगडी. -----------॥५॥

फू बाय फू... फुगडी गं ....फुगडी गं ....फुगडी गं....... फुगडी

कसे आवरावे हे वास्तवाचे ओझे?


एक वाट तुझी एक वाट माझी,
दिठीतल्या आसवां सुख नसे राजी.

एक हाक तुझी एक साद माझी,
भेटताना क्षितीजे ही भासतात खुजी.

एक क्षण तुझा एक क्षण माझा
क्षणाच्याही सुखासाठी असुसला राजा

एक हात तुझा एक हात माझा
भेटताना ऋतूं गंध दरवळेल ताजा.

एक स्वप्न तुझे एक स्वप्न माझे,
कसे आवरावे हे वास्तवाचे ओझे?