साहित्य प्रकार

Tuesday, August 7, 2012

शब्दांच्या मी वादळातला एक नारा

अमृताच्या पैजा मी गा जिंकणारा.
शब्दांच्या मी वादळातला एक नारा.

माणसात मी माणसाला शोधणारा
गर्दीच्या मी ढगा आडचा एक तारा.

अनाठायीच मांडला मी हा पसारा
जीवन आहे स्वप्नांचाच खेळ सारा.

विनासुखाचा कशास ये जन्मफ़ेरा
दु:ख घालते घडीघडीस येरझारा.

कश्या सावरू उरातल्या या त्सूनामीं ?
डोळ्यांमधल्या सागरास कुठे किणारा.

काय फ़ायदा पेटवूनी या मशाली?
डोळसांच्या अंधाधुंदी कारभारा

दुनियेमध्ये भिड माजली असत्याची
सत्याचाच रोज होतो कोंडमारा.

नकोस येऊ माणसात पुन्हा मेंढरा
फिरतो इथे अजून आहे अदिम वारा.

अंधाराचा झाकतो हा गुढ पिसारा
परी शब्दांचा उजेड नच लोपणारा.

आई

जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

मना मनात आहे धुके दाटलेले

मना मनात आहे धुके दाटलेले
ओठांत एक गाणे मुके गोठलेले.

कळपामध्ये जे ही मला भेटलेले
न्हवते कुणीच वेडे, वेड घेतलेले.

दिसतात जरी हे.. चेहरे हसलेले
प्रत्यकाच्या उरात युध्द पेटलेले.

आसक्तते पोटी.. प्रेम बाटलेले
चंदा पायी एका सुर्य झाकलेले.

विश्वासाने सांग सत्य भेटलेले
अविश्वासाचे का मेघ दाटलेले?

दिसवयास सारे वरून नटलेले
हिरवे झाड परी आतून वटलेले.

डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

नाहीच कोण येथे आले बनून ढाले*
छातीत खोल माझ्या गेले रुतून भाले.

पश्च्यात* कोण माझी चेष्टा करून गेले
डोळ्यात मेघ राणी वेगे भरून आले.

सोडून गाव आता जावे निघून कोठे?
गावात निंदकांचे पाढे रचून झाले.

आहेस कोण तू ही? आला कशास येथे?
माझाच भास मजला कोडे अशक्य घाले.

ओठात शब्द खोटा नाही कधीच आला
सत्याचे रोज ओठा द्यावे कुठून प्याले.

कोणास कोण खांदा कोणी कुणास वांदा
विश्वात गैर आता गाडा असाच चाले.

-----------------------------------------------------------------------------
ढाले = अंगावर येणारे वार ढालीने अढवणारा, दुसर्‍याचा जीव वाचवणारा.
पश्च्यात = उद्देशीत व्यक्ती नसताना, मागुर्‍या. चेहर्‍याआड
-----------------------------------------------------------------------------

Monday, August 6, 2012

अता वाकून ये आभाळा

अता वाकून ये आभाळा
जराशी होईन मी निळा

पहातोय वाट तुझी मी
बनुनी अहिल्येची शीळा

झुंजताना मी तनकटाशी
इथे मोडला रे विळा

गेली सारी सुकून राने
भरु दे चांदण्याने मळा

गेला संपून हा प्रवास
आता उघडावे दार तिळा.

हुदयाच्या ही कैक कळा
तुला सांगेन मी आभाळा

पाहू तरी तुझ्यात आता
खरा आहे किती जिव्हाळा.

जगणे म्हणजे कटकट नुसती

जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती

कोणी हसते कोणी रुसते
प्रत्यकाची ही वटवट नुसती.

पैका पैका जोडण्यास ही,
नाती तुटती तटतट नुसती

देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती

भासां मागे रोज धावते
पायांची ही फ़टफ़ट नुसती.