साहित्य प्रकार

Monday, August 6, 2012

अता वाकून ये आभाळा

अता वाकून ये आभाळा
जराशी होईन मी निळा

पहातोय वाट तुझी मी
बनुनी अहिल्येची शीळा

झुंजताना मी तनकटाशी
इथे मोडला रे विळा

गेली सारी सुकून राने
भरु दे चांदण्याने मळा

गेला संपून हा प्रवास
आता उघडावे दार तिळा.

हुदयाच्या ही कैक कळा
तुला सांगेन मी आभाळा

पाहू तरी तुझ्यात आता
खरा आहे किती जिव्हाळा.

जगणे म्हणजे कटकट नुसती

जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती

कोणी हसते कोणी रुसते
प्रत्यकाची ही वटवट नुसती.

पैका पैका जोडण्यास ही,
नाती तुटती तटतट नुसती

देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती

भासां मागे रोज धावते
पायांची ही फ़टफ़ट नुसती.

कसा राहू मी अभंग आता

कसा राहू मी अभंग आता
तुझा सोसवेना संग आता.

दवांत नाहून पहाट आली
ग झाक फ़ूलांचे अंग आता.

कधीचा आहे निरंगीच मी
तुझा वेगळा दे रंग आता.

फ़ुलावयाची तू ठेव आशा
पाषाण पावते भंग आता.

मधूर बोल हे निष्प्रेमाचे
शब्दही झाले भणंग आता.

जगाचा नुरला ताल विठ्ठला
इथे बोलेना मृदंग आता.

वास्तवाचाही स्वप्नामध्ये....!

अष्टोप्रहर झिजून येथे, रचली होती स्वप्नांची.. एक लगोरी
पण गनिमांचा या, तिलाच नेमके टिपण्याचा एक प्रयत्न होता.

-----------------------------------------------------------------
गझल -१
------------
या वास्तवाचाही स्वप्नांमध्येच, प्रवेशण्याचा एक प्रयत्न होता
अन माझ्याचमधला वेडा मी तो शोधण्याचा एक प्रयत्न होता?

तू म्हणतेस माझ्या डोळ्यातला तो दिवास्वप्नांचा भास होता.
पण मनातल्या या भूतकाळाला खोदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कटाक्ष केवढा लाघवी होता जो मनाला.. स्पर्शून गेला
का तुझाच तो ही, जादुगारी मन वेधण्याचा एक प्रयत्न होता ?

हरताना हा प्रत्यक डाव, हसलो मी.. विजयाच्याच उन्मादाने
पण संयमाने तो, दु:खास सुख संबोधण्याचा एक प्रयत्न होता.

मी बोललो स्पष्ट एकदा, चिरावे.. जसे विजेने अंधाराला
तो काळोखाच्या अवकाशालाच भेदण्याचा एक प्रयत्न होता.

तो कोणता वसंत होता, जो फ़क्त तुझी.. स्वप्नेच घेऊन आला?
की, त्याचाही तो, काळीज माझे छेदण्याचा एक प्रयत्न होता?

गझल -२
----------
घाव दिले जगण्याने, तरी दु:खास.. उरण्याचा एक प्रयत्न होता
डाव गेले उलटून, तरी विजेता.. ठरण्याचा एक प्रयत्न होता

दोष दिला पायांनी, मातीस तरी.. या, काही न बोलल्या वाटा
घायाळ पायांचा तो, दु:ख हलके करण्याचा एक प्रयत्न होता.

हरवूनी मजला, जिंकण्याचा, तुझाही.. तो हर्ष केवढा होता
जो जिंकताना मी, तुझ्याचसाठी हरण्याचा एक प्रयत्न होता.

त्या निंदकांच्याच, सोबतीने, सदा राहीलो..मी याच कारणा
दोष काढुनी माझा सत्वापुरते उरण्याचा एक प्रयत्न होता.

त्सुनामीत तू, दिलास हात, वाटलो.. मीच एक ओळखीचा म्हणुनी
पण बुडताना मज कळले, तुझाच तो तरण्याचा एक प्रयत्न होता.

गझल -- ३
---------------
सुकलेल्या फ़ूला फ़ूलाला पुन्हा फ़ुलवण्याचा एक प्रयत्न होता
विझता विझता स्वत:लाच तो पुन्हा हसवण्याचा एक प्रयत्न होता.

कळून सारे, उगा पुन्हा मी हसताना, का तुला भासलो वेडा?
हे दु:ख विसरण्या, स्वत:लाही तो फ़सवण्याचा एक प्रयत्न होता.

शब्दाने वाढला शब्द जरी, वादाचा ना होता प्रश्न कुठे?
तू मला नि मी तुला हा आतून समजण्याचा एक प्रयत्न होता.

सत्य शोधण्या, वणवण फ़िरलो दशदिशा,तेंव्हा मजला कळून चुकले
कुठेच न्हवते त्या गाण्याला हा रुजवण्याचा एक प्रयत्न होता.

गायलेस तू मंजुळ गाणे परंतू माझ्याच मी भानात न्हवतो..
पुरात विस्कटल्या प्रवाहाला तो जुळवण्याचा एक प्रयत्न होता.

कुड

तुझं खरं की माझं खरं
मनाचा भुंगा जीवाला या
असं रोज कुरतडत राहतो.

सत्याचं -असत्याचं मनात
जुंपतं रोज तुंबळ... अन-
कुणीतरी अज्ञात रक्षस
सुखलेल्या या जख्मांना
पुन्हा फ़ोडत राहतो.

कसं ! जगावं तरी कसं?
बाहेरच्या या जगात
नाही कुणालाच कळत
असा मी का चिडत राहतो.

कुण्या जन्माच हे पाप,
कि, जगण्याचा हा शाप?
कुणी नसताना ही माझा मी
मलाच, का कुडत राहतो?

सैर बावरी

कोण जिव्हाळ ओढीने
कुठे हा मेघ धावतो?
वेथेत पिंज पिंजूनी
निरव थेंब सांडतो.

शितचंद्र ओल ती
धरेत खोल साचते
एकलेच कोण ते
बनात फूल वेचते?

स्मृतीत आज चांदणें
मंद मंद हासते
उर्मिलेस का तरी,
सुने सुने भासते?

काय दाटले उरी
धुंद धावते पदी
कंप पावते जळी
सैर बावरी नदी.