साहित्य प्रकार

Friday, September 14, 2012

कसे आवरावे हे वास्तवाचे ओझे?


एक वाट तुझी एक वाट माझी,
दिठीतल्या आसवां सुख नसे राजी.

एक हाक तुझी एक साद माझी,
भेटताना क्षितीजे ही भासतात खुजी.

एक क्षण तुझा एक क्षण माझा
क्षणाच्याही सुखासाठी असुसला राजा

एक हात तुझा एक हात माझा
भेटताना ऋतूं गंध दरवळेल ताजा.

एक स्वप्न तुझे एक स्वप्न माझे,
कसे आवरावे हे वास्तवाचे ओझे?

जे व्हायचे ते घडून गेले


जे व्हायचे ते घडून गेले
इथे पावसाळे रडून गेले.

कोण वाचतो शब्दास आता
ज्ञान ग्रंथात सडून गेले.

घातले दाणें जरी मुठीने
उपाशीच पक्षी उडून गेले.

माझी मी दिली कुर्‍हाड ज्यांना
माझ्याशीच ते लढून गेले.

रक्तावर पोसले तरु जरी
पानगळीत हे झडून गेले.

गर्दीत पाहीले सोयरे जे
नजरे समोरच दडून गेले.

किती सावरावं प्रत्यकाला?

' प्रश्नांची पिशाच्च '


आज तरी कुणी जरा इकडे लक्ष देईल काय?
शकूनीच रक्त पुन्हा विमल करता येईल काय?

जिथे तिथे उभेच हे, मही- रावण- दुर्योधन
राम कॄष्ण बुध्दाला इथे जगता येईल काय?

अहिल्याच्या शिळेला आज देखिल वाटते भिती
साधुवानी रावण, रुप राघवी घेईल काय?

तुटलेली ही नाती आणि फाटलेली ही मनं
दुभंगल्या आकाशी आत्मा तरी जाईल काय?

प्रश्नांचीच पिशाच्च नाचतात माझ्या भोवती
कोणी मला त्यांची चोख उत्तरे देईल काय?

आम्ही


पुढच्याला मागे खेचनारे आम्ही
विजेत्यांचे नांगे ठेचनारे आम्ही

नाही कुठेच आमच्या हक्काचा बाग
दुसर्‍याचीच फ़ूले वेचनारे आम्ही.

बुध्दीने काढतो निर्बुध्दांची सोंगे
अध्यात्माला दूर फ़ेकनारे आम्ही.

आम्हासाठी आणेल घबाड त्याच्या
सरणावरी हात शेकनारे आम्ही.

अंगात आमच्या बाणा कर्तव्याचा
दुबळ्यांची बोटे चेपनारे आम्ही.

तू म्हणतेस मज, की, चित्तचोर मी


तू म्हणतेस मज, की, चित्तचोर मी
लोक म्हणती मज, असे बंडखोर मी.

दिसलो जरी असा, निर्विकार मी
असतो खोल आत, भावविभोर मी.

नाही दिप येथे, तुझ्या स्वागताला
काळजास केले, ही चंद्रकोर मी.

हास दु:खा उगाच, हास तुही आता
तुजसवे लावतो, पुन्हा एक जोर मी.

नको उगा बोलू, काही ही भलते
झाडाहून कसा, होईन थोर मी?

जरी तुझ्यासाठी, झालो मी बुजुर्ग
मनात एक उनाड, दडविले पोर मी.

फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे !


फ़सवूण आज गेले, सारेच पावसाळे
भोगावयास आले, नुसतेच हे उन्हाळे.

मेल्यावरीच येतो पाऊस आसवांचा
जगण्यात सांग कोठे लपतात हे जिव्हाळे?

वाकून चाल तू ही, लढण्यास जिंदगीशी
पाण्याखाली विनम्र झुकती जसे लव्हाळे.

नेकीने चालतो ही, सत्याची वाट अवघी
माझाच जीव मजला तरी पुन्हा न्यहाळे

जाता बुडूनी सांज पोटात सागराच्या
माझे अबोल गाणे पाण्यावरी खळाळे.